पुणे: पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या अनुषंगाने आज रविंद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली असल्याचे सांगितले आणि आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार असून त्यानंतर अपेक्षित निर्णय घेतला जाणार आहे असे सांगितले.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
सत्तेत असल्याशिवाय काम होत नाहीत
काँग्रेस सोडली मात्र काँग्रेसवर कधीच नाराजी नव्हती अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. काँग्रेस सोडण्याचा निर्णय हा कार्यकर्ते आणि मतदारांमुळे घेतला असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मला भरभरून दिले. माझी कोणावरही नाराजी नाही असेही त्यांनी म्हटले मात्र त्यासोबत त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले, ते म्हणाले की, सत्ता अनेक वर्ष पाहिली पण सत्तेचा लाभ मिळाला नाही.
का निवडली शिवसेना?
शिवसेना पक्ष निवडण्याचे कारण काय असे धंगेकरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें, मंत्री उदय सामंतांनी अनेकदा फोन केले. त्यांनी आमच्यासोबत या हे सांगितले. मी त्यांच्याकडे कोणतेही पद मागितले नाही. मी महानगर पालिका निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आज सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे त्यानंतर निर्णय घेतला जाईल.