मोठी बातमी : काँग्रेस आमदारांचं बंड; २५ आमदारांसह मंत्री दिल्लीत दाखल
राजकारण

मोठी बातमी : काँग्रेस आमदारांचं बंड; २५ आमदारांसह मंत्री दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : पंजाबमध्ये नवं राजकीय संकट निर्माण झालं असून पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. काँग्रेस हायकमांडकडून पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना दिल्लीत बोलवलं गेलं आहे. या ठिकाणी सर्व आमदार, मंत्री एका तीन सदस्यीय पॅनलशी चर्चा करणार असून, त्यांच्या समोर आपले म्हणणे मांडणार आहेत. काँग्रेसचे जवळपास २५ आमदार ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा आदी दिल्लीत पोहचले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निवडणुक काळात काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता न करण्यात आल्याच्या आरोपानंतर, काँग्रेस आमदरांकडून आपल्याच सरकारवर प्रश्न निर्माण केले जात होते. हे सर्व आमदार सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत होते. आज तकने या संदर्भात वृत्त दिलं आहे. हायकमांडने जे तीन सदस्यीय पॅनल बनवले आहे, त्याचे नेतृत्व हरीश रावत करत आहेत. त्यांच्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा यामध्ये समावेश आहे. आज हे पॅनल आमदारांशी चर्चा करणार आहे.

चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा हे देखील या पॅनलशी चर्चा करणार आहेत. तर, उद्या (ता. ०१) नवज्योत सिंग सिध्दू, परगट सिंह पॅनलला भेटतील. विशेष म्हणजे कॅप्टन अमरिंदर यांच्या गोटातील मानले जाणारे मनप्रीत बादल, साधु सिंह हे देखील दिल्लीत असून पॅनलशी चर्चा करणार आहेत. यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे या पॅनलशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.