भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष
राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल. पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. आणि या ‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ, सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता आप ची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल’ असा विश्वास आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या बजेटमधील निधी मूलभूत सुविधा ऐवजी सुशोभीकरणा वर खर्च  होतो आहे. दिल्लीत केवळ वचननामा   दिला नाही तर सर्व आश्वासन पूर्तता केली. तोच विश्वास आम्ही पुणेकरांना देऊ इच्छितो. निधीचा अपव्यय टाळला तरी मोठे उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. पुणेकरांच्या समस्या आधारित जाहीरनामा तयार केला जाईल असे आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले. आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशा स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो असे आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी सांगितले. दिल्लीतील विकास कामे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होत असलेली जनतेची फसवणूक यामुळे आप हा पर्याय जनता स्वीकारेल असे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक आदी उपस्थित होते. एस एम जोशी फौंडेशन सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात राज्य समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक, सचिव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.