औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर पुढे पुढे पाहा काय होतंय… महाविकास आघाडीचं एकमत करुनच आम्ही शहराचं नाव बदलू,” असं सूचक विधानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केल आहे. तसेच त्यासोबतच या शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही प्राधान्याने सोडवत आहोत”, असं त्यांनी म्हंटल आहे. तथापि, आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्याला आणखी बळ मिळालं आहे.

तर दुसरीकडे, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव लवकरच महाविकास आघाडी सरकार आणणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच औरंगाबादच्या नावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाजाचा उल्लेख का करावा? संभाजी राजेंच्याच नावानं हे शहर ओळखलं जावं, अशी भूमिका स्वत: मुख्यमंत्र्यांनी याआधीही मांडली आहे” , असं सुभाष देसाई म्हणाले. त्यामुळे नामांतरणाला काँग्रेसचा स्पष्ट विरोध असतानाही देसाई यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, औरंगाबाद नामांतरणाला काँग्रेसने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट नकार दिलाय. तर शिवसेना मात्र संभाजीनगर असं नामांतरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.