राजकारण

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

नाशिक : ”औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.” अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादच्या नामांतरणावर भाष्य केले आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिक येथे पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू”. असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबतही भाष्य केले. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, पहिल्यांदा महाराष्ट्र आणि भारत कोरोनामुक्त व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. हे झाल्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वीप्रमाणे होईल. यावेळी फिजिकल डिस्टंसिंग ठेवावं लागणार नाही तसंच मास्कही लवाण्याची गरज पडणार नाही. राज्याचा विकास होत असताना साहित्य, संस्कृती हा महत्वाचा भाग असल्याने तो दुर्लक्षित करुन चालणार नाही.”

त्याचबरोबर, ”ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत ब्रिटनहून विमानानं जे प्रवाशी राज्यात दाखल झाले त्यांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना तपासून त्यांच्यावर योग्य उपचार करुनच घरी सोडण्यात येत आहे. यामध्ये दोन प्रवासी करोना पॉझिटिव्ह मिळाले मात्र त्यांच्यामध्ये नव्या करोनाच्या विषाणूचा संसर्ग नव्हता तर त्यांना पहिल्याच विषाणूचा संसर्ग झालेला होता. त्यांना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं असून ते लवकरच बरे होतील.