टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…
राजकारण

टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…

नवी दिल्ली : मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केले होते. या वक्तव्यानंतर यादव यांच्यावर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलला आहे. ”गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असे ट्वीट करत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. खरतरं, कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी, अशी सर्वजण प्रार्थना करत असताना, दुसरीकडे या वॅक्सीनवरून राजकारणही सुरू झाल्याचं दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यादव यांच्या वक्तव्यानंतर तर त्यांच्यावर चारी बाजूने टीका होत होती. मात्र त्यानंतर त्यांनी ट्वीट करत सारवासारव करण्याचा केला आहे. “कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे भाजपा सरकारने याला कोणताही सजावटीचा-दिखावा करणारा इव्हेंट समजू नये आणि अगोदरच सर्व व्यवस्था करून याची सुरूवात करावी. हा लोकांच्या जीवनाचा विषय आहे, शेवटी यामध्ये नंतर सुधारणांचा धोका नाही पत्कारता येत. गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असं आज अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे.

तसेच, “आम्हाला शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु भाजपाची टाळी-थाळीवाली अवैज्ञानिक विचारसरणी व भाजपा सरकारच्या वॅक्सीन देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही, जी करोनाकाळात ठप्प झाल्यासारखी आहे.” असं देखील अखिलेश यादव यांनी ट्विट करून टीकाकारांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

तर अखिलेश यादव यांच्यानंतर समाजवादी पार्टीचे मिर्झापूर येथील आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील आज कोरोना लसीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. “कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं खळबळजनक विधान आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.