राजकारण

‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच’; नाथाभाऊंकडून पक्षांतराच्या चर्चांचे खंडन

जळगाव : ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत. ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स.” अशी उत्तरे देत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षांतराच्या चर्चा उधळून लावल्या. जळगावात दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांना पक्षांताराच्या प्रश्नावर अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. आज दुपारी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत.”

त्यानंतर त्यांनी बोरखेड्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येच्या घटनेबाबत बोलताना खडसे म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या”. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

तर जळगावात घडलेल्या या घटनेबाबत त्यांनी पोलीस यंत्रणांवरही हल्लाबोल केला. “जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत मी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण काहीएक उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे,” असा आरोपही खडसेंनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत