राजकारण

अमृता फडणवीसांनी ट्वीट करत पुन्हा राज्यसरकारला डिवचलं

मुंबई : ”मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार?” असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्राद्वारे झालेल्या लेटरवॉर नंतर अमृता फडणवीस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळत आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना दुसरीकडे अमृता फडणवीस देखील मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमृता फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी “वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते” असे ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या की, ”अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मंदिरे उघडण्यासंबंधी आणि हिंदुत्त्वावरून त्यांना सवाल केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनीदेखील त्यांच्या पत्राला उत्तर दिले. मंदिर उघडण्यासंबंधी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विट करत महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत, मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला.

त्यावर उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. “आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले?

”हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ”“माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना उत्तरही दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत