ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

ईडी चौकशीवर अनिल देशमुखांनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावून ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली आहे. माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.