बाळा नांदगांवकर यांना अटक; मनसे आक्रमक
राजकारण

बाळा नांदगांवकर यांना अटक; मनसे आक्रमक

मुंबई : कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी परिसरात कार्यकर्त्यांसोबत दहीडंडी फोडली आहे. यावेळी बाळा नांदगावकर आणि पोलीस आमने-सामने आले होते. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र मनसैनिक दहीडंडी फोडण्यावर ठाम राहिले. दहीडंडी फोडल्यानंतर पोलिसांनी बाळा नांदगावकर आणि इतर कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात आज काही ठिकाणी हा मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडाही फडकवला आहे.