शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मागील काही दिवसांपासून बाळासाहेब सानप भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. सानप भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरही शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या मनधरणीला यश आले नाही. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी आज (ता. २१) भाजपमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर थोडसं चुकल्यासारखं वाटतं. यावर चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी समजून घेत पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याची भावना सानप यांनी व्यक्त केली.