तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
राजकारण

तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; भाजपचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“महाभकास आघाडी आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांची चार दिन की चांदनी आटोपण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याचीही गरज नाही. असे अजानवाले हिरवे हिंदुत्व, दत्तात्रय गोत्र आणि ११० कोटींची वांगी किती काळ चालणार? तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या. (कारण) त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल”, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दरम्यान,  हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांवर आणि प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. यावेळी, विरोधकांसारखे विकृत राजकारण आम्ही करत नाही. असेही त्यांनी यावेळी म्हंटले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ”महाराष्ट्रात काही सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्याला नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती. या. हे सगळं काय आहे? ही विकृतीच आहे. असं विकृत राजकारण आम्ही करत नाही” असेही त्यांनी म्हंटले होते.