भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल
राजकारण

भवानीपूर पोटनिवडणुकीत लागला ममता बॅनर्जींचा निकाल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मोजणी झाल्यानंतर ममता यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.

तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला होता की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत.