बीएचआर घोटाळ्यात भाजपचा मोठा नेता गळाला? पोलिसांना दिले ढिगभर पुरावे’
राजकारण

बीएचआर घोटाळ्यात भाजपचा मोठा नेता गळाला? पोलिसांना दिले ढिगभर पुरावे’

जळगाव : राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात भाजपचा मोठा नेता गळाला लागण्याची शक्यता आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने ऑनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.

बीएचआर पतसंस्था डबघाईस येऊन अवसायनात गेली. त्यावेळी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी अवसायक म्हणून आपल्या मर्जीतील जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करवून घेतली. पाच वर्ष त्यांची बदली होऊ दिली नाही. अवसायक कंडारे यांच्या माध्यमातून लिलावाचा देखावा करून सुनील झंवर यांच्यासह काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या नावे कवडीमोल दराने मालमत्ता घेतल्या. त्यातही मालमत्तांच्या लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना परत करणे अपेक्षित होते. मात्र रक्कम न भरता बहुतांशी ठेवीदारांच्या पावत्या कमिशनवर घेऊन त्यांचा भरणा केला. अशा प्रकारे ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप ललवाणी यांनी केला आहे.