सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा झटका; भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
राजकारण

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा झटका; भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक भाजपा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाचे कल्याणराव काळे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे म्हंटल्यानंतर काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय स्थलांतराला सुरूवात झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाचे काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. अशातच भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार शुक्रवारी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या भाषणाचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

“आपण यापुढे शरद पवार जे सांगतील, त्या पध्दतीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असं कल्याणराव काळे भाषणात म्हणाले. या भाषणानंतर काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील मोठं नाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमाध्ये गेले होते. काळे हे भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापकही आहेत. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे.