मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
राजकारण

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केल्यानंतर आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, बाळासाहेब थोरातांकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रतील काँग्रेसचे काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावे यासाठी हायकमांडकडे लॉबिंग करत होते अशी चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरुन दिल्लीत होणारी चर्चा यामुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि काँग्रेसने याला पाठिंबा द्यावा यात बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका बजावली होती. तसंच त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक होती. परंतु प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीमुळे थोरात नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोडण्याचं ठरवलं असं सांगितलं जात आहे.

तर दुसरीकडे बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे, बाळासाहेब थोरात हे कडवट काँग्रेसी आहेत, त्यांनी कधीही पक्षातील पदासाठी लॉबिंग केली नव्हती.

थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती, प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा बाळासाहेब थोरात यांची भूमिका असली तरीही हायकमांड काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेब थोरात यांना पक्षाची वाढ करत सरकार सांभाळण्याची दुहेरी भूमिका सांभाळावी लागत होती, त्यामुळे आता जे नेतृत्व पुढे येईल ते सर्वमान्य असावं आणि त्याचसोबत आघाडी सांभाळण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणारं नेतृत्व देण्याचं आव्हान पक्षासमोर असणार आहे.