भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री
राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपने दोन मुख्यमंत्री बदलले.

त्यानंतर, आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजप पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, अशा प्रकारे भाजपने सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलले आहेत.