राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, हा तर उदयनराजेंचा अपमान
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, हा तर उदयनराजेंचा अपमान

सातारा : उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अपमान केला आहे. भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भाजपने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अपमानच केला आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला चांगली माहीत आहे. भाजपने शब्द दिल्याने त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊनही संधी दिली नसल्याची चर्चा साताऱ्यात आहे.