औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून ‘या’ भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

नगर : औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते डॉ. गिरीश महाजन यांनी शनिवारी नगरचा दौरा केला. तत्पूर्वी त्यांनी महाजन आणि खा. डॉ. सुजय विखे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, ”औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. केवळ तेथील निवडणुकासमोर ठेवून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादच्या नागरिकांना आठ-आठ दिवस पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते. यावरून लक्ष दूर हटवण्यासाठी नामांतराचा मुद्दा शिवसेनेने काढला आहे, असा आरोप भाजपचे माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी केला.

”शिवसेना सध्या भूमिका रोज बदलत आहे. शिवसेनेची कोणतीही स्वत:ची मूल्य राहिलेले नाहीत, शिवसेनेला सध्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. शिवसेनेकडे राज्यातील सत्ता आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. परंतु शिवसेना दाखवते वेगळे आणि करायचे काहीच नाही, अशा पद्धतीने काम करते. मागील काळात शिवसेना आमच्यासोबत होती. त्या वेळेस त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी आग्रह करायचा होता. मात्र त्या वेळी शिवसेना काही बोलली नाही. आता मात्र निवडणुकासमोर बघून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या. त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालवला आहे. असेही यावेळी महाजन यांनी सांगितले.

नामांतराच्या मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील, असा आरोपही महाजन यांनी केला. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्दय़ाचे फार घेणेदेणे नाही.