संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’
राजकारण

संजय राऊत यांचे नातेवाईकही ‘ईडी’च्या रडारवर’

मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. भाजपकडून सुडाचे राजकारण करण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीची नोटीस आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे, असं नितेश राणे यांनी सांगितले. नितेश राणे यांनी शनिवारी हिंगोलीत आयोजित पत्रकार परिषदेत हा दावा केला.

संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

याआधी प्रताप सरनाईक यांनी ईडीची नोटीस मिळाली होती. मात्र मी कोविड-१९ नियमानुसार क्वारंटाईन आहे. त्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. त्याला ईडीकडून सहमती दर्शविण्यात आली आहे.