गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव
राजकारण

गड आला पण सिंह गेला! बंगाल सहज जिंकलं; ममतांचा मात्र पराभव

कोलकाता : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सहज विजय प्राप्त करत २००हून अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र, पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे उमेदवार आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांचा १६२२ मतांनी पराभव केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपला हक्काचा भोवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा ममता बॅनर्जी यांचा निर्णय अपयशी ठरल्याचं निकालांवरून दिसत आहे. मात्र, नंदीग्राम निवडणूक ममता बॅनर्जींनी प्रतिष्ठेची केली होती, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळू शकला नाही.

रविवारी सकाळी नंदीग्राममध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी या दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. प्रत्येक फेरीनुसार दोघांमध्ये मतांचा फरक कमी-जास्त होत होता. दुपारच्या सुमारास बराच काळ भाजपचे सुवेंदू अधिकारी मोठ्या फरकाने आघाडीवर होते. त्यामुळे ममता बॅनर्जींना आव्हान म्हणून घेतलेल्या या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत होते. एकवेळ ममता बॅनर्जी जिंकतील असे वाटत असतानाच त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी पराभव स्वीकारला आहे.

नंदीग्राम हा अधिकारी यांचा आधीपासूनच गड राहिला आहे. त्यामुळे भाजपने त्यांना नंदीग्राममधूनच उमेदवारी दिली. पण संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना धडा शिकवण्यासाठी भोवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालप्रमाणे इथे मात्र ममता यांना बाजी मारता आली नाही. त्याठिकाणी मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ झाला मात्र शेवटी ममता यांचा पराभव झाल्याचे आणि मतमोजणी समाप्त झाल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना एकूण 109673 मते मिळाली आहेत. त्याचबरोबर ममता यांनी मतदानाची फेरतपासणी करुन पुन्हा मतमोजणी करावी अशी मागणी केली आहे.