राजकारण

राष्ट्रवादीला मोठा दणका; पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या अवताडेंचा विजय

पंढरपूर : देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला असून भारतीय जनता पक्षाच्या समाधान अवताडे यांचा विजय झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गोपिचंद पडळकर यांनी समाधान अवताडे यांचा ७ हजार मतांनी विजय झाला असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी, सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपकडून समाधान अवताडे आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळाला. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी जवळपास ७ हजार मतांनी विजय मिळवला असल्याने महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय जनता पक्षाची विधानसभेत १०५ सदस्यसंख्या होती ती आता या विजयांसह १०६ होणार असून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी या विजयावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. दरम्यान, मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवली. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली होती तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली होती. त्यानंतर ही आघाडी अवताडे यांनी विजयापर्यंत कायम ठेवली.