भाजपचे लक्ष आता काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यावर; पुरावे जमवल्याचा दावा
राजकारण

भाजपचे लक्ष आता काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्यावर; पुरावे जमवल्याचा दावा

नगर : महाविकास आघाडीच्या सरकारमधील वन आणि त्या पाठोपाठ गृह खात्याच्या मंत्र्यांची विकेट पडल्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना लक्ष करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी वाळू तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सात दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही आपल्यासमवेत उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहनही विखे यांनी दिले आहे. नाव न घेता त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना या मुद्द्यावरून टार्गेट केल्याचे दिसून येते.

राज्यातील वन विभागाचे तत्कालीन मंत्री शिवसेनेचे संजय राठोड आणि तत्कालीन गृहमंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना विविध आरोप झाल्याने मंत्रिदाचे राजीनामे द्यावे लागले. तेव्हापासून अन्य काही खात्यांच्या मंत्र्यांचाही नंबर लागणार असल्याची वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येऊ लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी पुढाकार घेत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. विखे यांनी काँग्रेसचे थोरात यांच्या महसूल विभागाला बदल्या आणि वाळू तस्करीच्या मुद्द्यांवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.