काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
राजकारण

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चंदीगढ : पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय भवितव्याविषयी देखील सूतोवाच केले. मात्र, त्याआधी त्यांनी काँग्रेस हायकमांडविषयी देखील नाराजी व्यक्त केली. मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितल होतं की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटतं की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय, असं अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावं, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. “दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवलं. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठीक आहे, असं ते म्हणाले.