निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत
राजकारण

निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत

नगर : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून नगरमधील निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीरनाम्यातून आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुरुवारी (२३ सप्टेंबर) प्राथमिक सुनावणी होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली आहे. निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा, अशी मागणी भांबरकर यांनी यामध्ये केली आहे. भांबरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

भांबरकर यांनी म्हणाले की, आमदार जगताप यांनी २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी जाहीरनाम्यात त्यांनी नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचा दावाही केला होता. काही युवकांचे आम्हाला आयटी पार्कमध्ये नोकरी मिळाल्याचे व्हिडिओही सादर करण्यात आले होते. त्यामुळे यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी यासंबंधी आपण माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. तेव्हा संबंधित यंत्रणेकडून नगरमध्ये आयटी पार्कच नसल्याचे कळविण्यात आले आहे.

एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्क विषयी आपण माहिती मागितली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाने आयटी पार्कला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याचे आपल्याला कळविले. एमआयडीसी कार्यालयाचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांचे परिपत्रक २६ ऑक्टोंबर २०१६अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे. या आयटी पार्कची जागा इतर उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे, असे उत्तर आपल्याला मिळाले आहे. याच अर्थ आमदार जगताप यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचे दिसून येते, असा आरोप भांबरकर यांनी केला आहे.