लालू प्रसाद यादवना कोर्टाचा झटका, चारा घोटाळाप्रकरणी ५ वर्षांची सुनावली शिक्षा
राजकारण

लालू प्रसाद यादवना कोर्टाचा झटका, चारा घोटाळाप्रकरणी ५ वर्षांची सुनावली शिक्षा

रांची : चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav ) यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितले. तिथे लालूंसाठी जामीन अर्ज दाखल केला जाईल. लालूप्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे, असा युक्तिवाद केला जाईल. आम्ही न्यायालयात प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते, असे त्यांचे वकील म्हणाले. सध्या लालू यादव ७३ वर्षांचे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लालू यादव यांच्यासह या प्रकरणातील ३८ दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. १५ फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.

या प्रकरणात सीबीआयने एकूण १७० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर २६ सप्टेंबर २००५ ला १४८ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळा प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ९९ जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २९ जानेवारीला आपला निकाल राखून ठेवला होता.

लालूंच्या शिक्षेवर तेजस्वी यादव म्हणाले…

लालूजींनी भाजपशी हातमिळवणी केली असती तर त्यांना राजा हरिश्चंद्र म्हटले गेले असते. लालूजींसोबत जे काय चालले आहे ते जनता पाहते आहे. यूपीची जनताही पाहते आहे. जनता भाजपला मतांमधून उत्तर देण्याचे काम करणार आहे. लालूजींना तुरुंगात पाठवल्याने पक्ष कमकुवत होईल, असे लोकांना वाटते. आम्ही जास्त जागा आणल्या होत्या. लालूजींचा प्रत्येक शिपाई भाजप आणि आरएसएस आणि नितीश सारख्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी काम करेल, अशी प्रतिक्रिया लाल यादव यांचे सुपुत्र आणि पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

देशातील सर्वात मोठ्या ९५० कोटी रुयांच्या चारा घोटाळ्याचा (डोरांडा ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार) हा निकाल १५ फेब्रुवारीला न्यायालयाने दिला. विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav convicted) यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले होते. त्याचबरोबर २४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.