सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे – चंद्रकांत पाटील
राजकारण

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे – चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सीमाप्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सनदशीर, लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मंत्री श्री. पाटील यांचे शासकीय निवासस्थान सिंहगड येथे स्वराज्य संकल्पक श्री. शहाजीराजे भोसले स्मारक समिती बेंगलोर, शिवछत्रपती स्मारक समिती बीदर, शिवप्रेमी युवक मित्र मंडळ बीदर या संघटनांनी कर्नाटकचे माजी आमदार डॉ. एम.जी मुळे यांच्या समवेत बीदर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने निवेदन देऊन राज्य शासनाने सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन केले होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठे बळ मिळावे यासाठी सीमा भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मदाय, सांस्कृतिक संस्था व संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. सीमा भागात मराठी भाषा, संस्कृती व लोककला टिकविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी समितीच्या सदस्यांनी राज्य शासनाचे आभार मानत न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.