शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा
राजकारण

शिवसेनेचा भाजपला दणका; चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात फडकला भगवा

कोल्हापूर : शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावात भगवा फडकवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय. प्राथमिक कलांमध्ये गावातील सहा जागांवर शिवसेनेनं भगवा फडकवला आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तीनही पक्षांमधील स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र शिवसेनेने यामधूनही बाजी मारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोल्हापूरमधील खानापूर ग्रामपंचायतीमधील ही अनोखी आघाडी साऱ्या राज्यात चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उघडपणे या आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या आघाडीवरही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मात करुन विजश्री भगव्याकडे खेचून आणली आहे. या विजयाबरोबरच चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावात म्हणजेच खानापूरमध्ये सत्तांतर घडलं आहे.

सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. तेव्हा सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विरोधकांनी टीका केल्याचे पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे.