चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ
राजकारण

चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ

चंदीगढ : चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चरणजित सिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.