ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’
राजकारण

ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. फडणवीसांनी शिंदेंना खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न भाजप प्रत्यक्षात उतरवत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.

खरं तर शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळाला खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले असले तरी आता सरकारमधील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवून पडद्यामागून कारभाराची सूत्रे हाताळण्याचा भाजपचा (BJP) मानस दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वात महत्त्वाची खाती भाजपकडे राहील, अशी शक्यता आहे.