मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण
राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारण

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईत दाखल झाल्या. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ममतांनी थेट प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकर बरं वाटावं यासाठी मी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं त्या दर्शनानंतर म्हणाल्या. मला इथं येऊन अतिशय समाधान झाले असून मला चांगली सुविधा पुरवण्यात आली. मी आनंदी आहे, असे म्हणतानाच ‘जय मराठा, जय बांगला’ असा नारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमध्येही गणपतीची पूजा केली जाते. यावेळी त्यांनी मंदिर समिती, मंदिराचे विश्वस्त, पंडित, गुरूजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज संध्याकाळी त्या हॉटेल ट्रायडंट येथे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेत आहेत.

‘ममता- उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विट करत माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. पण आरोग्यासंबंधीच्या काही निर्बंधांमुळे त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार नाही. हे पाहता मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडे सात वाजता ममता बॅनर्जी यांना हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहोत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.