अहिल्यादेवींच्या पुतळ्याची विटंबना, पडळकरांवर कठोर कारवाई करा
राजकारण

अहिल्यादेवींच्या पुतळ्याची विटंबना, पडळकरांवर कठोर कारवाई करा

जेजुरी : खंडोबा नगरी जेजुरी येथे आज शुक्रवारी पहाटे दुर्दैवी घटना घडली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याच्या चबुतऱ्यावर हुल्लडबाजी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. भाजपच्या व्होटबँक पॉलिटिक्ससाठी पडळकरांनी केलेल्या या निच कृत्याचा मी विक्रम ढोणे, धनगर विवेक जागृती अभियानाचा संयोजक म्हणून तीव्र शब्दांत निषेध करतो. भाजपच्या फायद्यासाठी अहिल्यादेवींच्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पडळकर टोळीवर मोक्का लावावा, अशी आमची मागणी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जेजुरी येथील देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे लोकार्पण उद्या होत आहे. या कार्यक्रमाला विरोध म्हणून पडळकरांनी आज अहिल्यादेवींच्या पुतळ्याची हेळसांड केली. हा अहिल्यादेवींचा अवमान आहे. यानिमित्ताने पडळकरांकडून पुतळा परिसराला धोका पोचवण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या स्ट्र्र्र्ॅटेजीचा भाग म्हणून पडळकरांनी गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आणि होळकरांच्या नावाची अवहेलना चालवली आहे. भाजप वाढवण्यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कार्यक्रम ही भाजपची अधिकृत भुमिका आहे. त्यानुसार पडळकर पवारांवर टीका करतात आणि त्यात धनगर समाजाला ओढण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जात आहे.

जेजुरीतील हुल्लडबाजी ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात अहिल्यादेवींच्या नावाला भाजपकडून गालबोट लावण्यात आले आहे. त्यामुळे सखोल चौकशी झाली पाहिजे. अहिल्यादेवींचा पुतळा जेजुरी देवस्थान ट्रस्टने उभारला आहे, त्या कार्यक्रमाला होळकरांचे खरे वंशज निमंत्रित आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आहे, मात्र होळकरांचे खरे वंशज महाराष्ट्राला माहित होत असल्याने भाजपचे पित्त खवळले आहे. कारण गेल्या काही वर्षापासून होळकरांचे अनेक खोटे वंशज तयार करून भाजपकडून राज्यभर फिरवले जात आहे. त्यांचे पितळ यानिमित्ताने उघडे पडत आहे. जेजुरीतील हुल्लडबाजी भाजपनेच घडवून आणली आहे.

देवस्थानांच्या ठिकाणी राजकारणाचा अड्डा करण्याची पडळकरांची खोड जुनी आहे. तीन वर्षापुर्वी त्यांनी आरेवाडीच्या बिरोबाच्या ठिकाणी वाद करून खोट्या शपथा घेतल्या होत्या. सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचे स्मारक हे भाजपचा राजकीय अड्डा करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो आम्ही हाणून पाडला. धनगर आरक्षणप्रश्नी तर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा स्वार्थ पडळकरांनी साधला.

आम्ही यासंदर्भाने मांडत असलेली खरी भुमिका सहन होत नसल्याने अभियानाची (माझी) पंढरपुरातील पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न झाला. आता जेजुरीत हुल्लडबाजी करून थेट अहिल्यादेवींची अवहेलना केली आहे. पडळकर हे लांडग्याच्या प्रवृत्तीचे आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ते समाजाचे नुकसान करत आहेत. याविषयाच्या सखोल चौकशीसाठी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे.