राजकारण

ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच असे केले; काँग्रेस राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालील मांजर न झाल्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केला आहे. पुण्याच्या महापालिका आयुक्त पदावरून शेखर गायकवाड यांना काढण्यात आल्यावरून पुण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

काही सत्ताधाऱ्यांना महापालिका आयुक्त हे ताटाखालचे मांजर असावे, असे वाटते. शिवाय त्यांची बदली करताना पूर्वीच्याच पदावर करण्यात आली आहे. जर त्यांना पूर्वीच्याच पदावर नियुक्त करायचे होते तर, सहा महिन्यांनासाठीच पुणे महापालिकेत त्यांना आणले होते का? असा प्रश्नही बालगुडे यांनी उपस्थित केला आहे. गायकवाड यांची बदली रद्द करावी आणि त्यांना पुन्हा महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्त करावे, अशी मागणीही बालगुडे यांनी केली आहे.

अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या या बदलीमुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब झाली असल्याचेही संजय बालगुडे यांनी म्हटले आहे. गायकवाड यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यांनंतर अवघ्या दोन महिन्यांतच शहराला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, त्यातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. रुग्णांना बेडही उपलब्ध होत आहेत. टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल करताना त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू लागली होती. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी एका सैनिकाप्रमाणे काम केले. या बरोबरच महापलिकेतील भ्रष्टाचाराही अनेक प्रकरणेही त्यांनी शोधून काढली. त्यातून पुणेकरांचे पैसे वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. महापालिकेत भाजपच्या उधळपट्टीला त्यांनी लगाम घातला. त्यामुळे त्यांची बदली होणे म्हणजे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे असल्याचेही बालगुडे यांनी म्हटले आहे.