ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक
राजकारण

ममता बॅनर्जी पुन्हा लढणार पोटनिवडणूक; आधीही लढविली होती निवडणूक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूकीत नंदीग्राममधून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोटनिवडणूकीबाबत आयोगाने म्हटले आहे की, मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी केली जाईल. तसेच ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूरमधून निवडणूक लढवू शकतात. तसेच निवडणूक आयोगाने कोविड-१९ची परिस्थिती पाहता इतर ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ १५९-भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

२०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. ममता बॅनर्जी यांनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केलं होतं. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांचं विजयी अंतर कमी झालं होतं. तेव्हा त्यांनी काँग्रेस उमेदवार दीपा यांना २५,३०१ मतांनी पराभूत केलं होतं. मात्र यावेळेस त्यांनी भाजपला आव्हान देत नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता आणि भवानीपूर मतदारसंघ सोडला होता.