राजकारण

भाजपला झटका; माजी आमदाराचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी होती. परंतु आता उलटी गिनती सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आज (ता. ०९) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, पाडवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. याबातची माहिती अजित पवार यांनी आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु, आता सरकार बदलले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीही सहभागी झाल्याने उलटी गिनती सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहेत.

कोण आहेत उदयसिंग पाडवी?
उदयसिंग पाडवी हे 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहाद्यातून उदयसिंग यांच्याऐवजी पुत्र राजेश पाडवी यांना तिकीट दिलं.

उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या उदयसिंग पाडवी यांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. त्यानंतर पाडवींना मतदारसंघही बदलून मिळाला. त्यामुळे शहादाऐवजी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना मतदारांनी कौल दिला नाही.

भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयकुमार गावित यांना 94 हजार 442 मतं मिळाली होती, तर उदयसिंग पाडवी यांना 35 हजार 39 मते मिळाली होती. काँग्रेसमध्ये मात्र ते अल्पकाळ थांबले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत