परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
राजकारण

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिंग यांनी देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिलं होतं, त्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे. एवढंच नाही या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज चौकशीची देखील मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईतील प्रत्येक बारकडून ३ लाख रूपये वसुली करून १०० कोटी रूपये जमवून देण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये केला होता. या आरोपांवर राज्य सरकारने लक्ष दिलं नसल्याने आता परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शरद पवार यांनी आज (ता. २२) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ज्या काळात परमबीर सिंग यांनी आरोप केला त्या तारखेला ते क्वारंटाईन असल्याचं सांगितलं. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा व्हिडीओ टवीट केला आहे. पण या तारखेला अंगात ताप असताना आपण हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना, लांब बसून आपण पत्रकार परिषद घेतली, यानंतर आपण क्वारंटाईनच होतो, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.