नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अखेर मिथुन चक्रवर्ती यांचा अधिकृतपणे भाजप पक्षप्रवेश
राजकारण

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अखेर मिथुन चक्रवर्ती यांचा अधिकृतपणे भाजप पक्षप्रवेश

पश्चिम बंगाल : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पूर्णविराम दिला आहे. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मतदान 27 मार्चपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा पार पडली. पंतप्रधान सभास्थळी पोहचण्यापूर्वी एक तास अगोदरच मिथुन चक्रवर्ती मंचावर दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांच्या कोलकाता रॅलीमध्ये मंचावर मिथुन चक्रवर्ती उपस्थितीवरुनच ते बंगाल निवडणुकींमध्ये भाजपसाठी प्रचार करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची ही राजकारणातील दुसरी इनिंग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल कांग्रेसकडून 2014 मध्ये राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी 16 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

दरम्यान, बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 27 मार्च रोजी बंगलामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 6 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 31 जागांसाठी मतदान केलं जाणार आहे.

10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाचवा टप्पा 17 एप्रिल रोजी पार पडणार असून येथे 45 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. याव्यतिरिक्त 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात 41 जागांसाठी, तर 26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी आणि आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बंगाल निवडणूकींचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.