हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे; सचिन पायलटांचा आरएसएसवर हल्लाबोल
राजकारण

हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे; सचिन पायलटांचा आरएसएसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ”नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे.” अशा शब्दात राजस्थान कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.जयपूर येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना पायलट म्हणाले, “ दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्षलवादी, माओवादी, विभाजनवादी आणि दहशतवादी संबोधलं जात आहे. कारण शेतकऱ्यांचा एकही नेता केंद्र सरकारमध्ये नाही, जो शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत विचार करेल. जर शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे राजकारण असेल तर आम्ही ते करत आहोत. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आणि कायम पाठिंबा राहिल.”

केंद्रानं हे समजून घ्यायला हवं की काही कायदे मागे घेतल्याने कुठलंही नुकसान होणार नाही. तसेच, शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हा इतकाही क्लिष्ट नाही की तो केंद्र सरकार सोडवू शकत नाही. तुम्हाला फक्त इतकचं सांगायचंय की आम्ही यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) अंतर्भाव करतो आहोत आणि तिन्ही कायदे मागे घेत आहोत. जर केंद्र सरकारनं कायदे मागे घेतले तर आम्ही त्यांचे आभार मानू पण ते हे कायदे मागे घेणार नाहीत कारण ते हटवादी आहेत. कायद्यात सुधारणा करणे, ते मागे घेणे किंवा माफी मागणं ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे नेत्यांची उंची वाढते, ही लाज वाटण्याची बाब नाही.” असेही पायलट यावेळी म्हणाले.

देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपामध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे.”

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसल्या आहेत. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहावेळा चर्चा झाली. मात्र, या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी संघटना या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, केंद्र सरकारही मागे हटण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात सातव्यांदा चर्चा होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या चर्चेत तोडगा निघतो की आंदोलन सुरूच राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.