योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं
राजकारण

योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं

 

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई : “ती नटी म्हणतेय की मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  मुंबईत आले आहेत. त्यांनी स्पष्ट करावं की ते नेमकं मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीमध्ये,” असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रनौत तसेच योगी आदित्यनाथ यांना लगावला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच योगी आदित्यानाथांनी युपीत फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केल्याने राजकीय टीका टिप्पणीला उधाण आले आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी योगिवर आणि कंगनावर निशाणा साधला आहे. 

टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी योगी आदित्यनाथ आणि कंगना रानौतवर निशाणा साधला आहे. यावेळी राऊत यांनी कंगना रनौतला भाजपची कार्यकर्ती असलेली नटी संबोधलं आहे. “भाजपची कार्यकर्ता असलेली ती नटी मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर असल्याचं म्हणाली होती. योगी आदित्यनाथ मुंबईत आलेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आलेत हे त्यांनी स्पष्ट करावं. योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं की मी मुंबईत आलो आहे. मुंबईत सुरक्षित असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगायला हवं,” असं राऊत यांनी विचारलं आहे. 

तसेच, योगी आदित्यनाथ मुंबईतील बॉलिवूड, तसेच राज्यातील उद्योगांसाठीची गुंतवणूक उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. ‘मुंबईत सर्वांना यावं लागतं, मुंबई देशाचे पोट भरते. उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगींना मुंबईतच यावं लागलं, हा मुंबईचा गौरव आहे. मुंबईचे जे महत्व आहे, त्याला कुणीही नखं लावू शकत नाही. युपीसारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल तर आम्ही स्वागत करतो,” असे राऊत म्हणाले.

त्याचबरोबर, यापूर्वीही नोएडात फिल्मिसिटी निर्माण केली होती. तिचाही त्यांनी जिर्णोद्धार केला पाहिजे. त्या फिल्मसिटीचे काय झाले? असं त्यांनी योगींना विचारलं. उत्तर प्रदेशची स्थिती बघायची असेल तर मिर्झापूर वेब सिरिज पहा, असे राऊत यांनी म्हटलंय. तसेच, या सिरिजमध्ये दाखवलेली स्थिती जर सत्य असेल तर तिथं फिल्मसिटी नेवून काय करणार?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच, मुंबईशी स्पर्धा करणं न्यूयॉर्कलाही जमलं नाही, असे म्हणत राऊत यांनी योगींना अप्रत्यक्षपणे डिवचलं.