मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला नाही? संतोष बांगर शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले…’ व्हिडीओ व्हायरल
राजकारण

मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला नाही? संतोष बांगर शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले…’ व्हिडीओ व्हायरल

शिंदे गटाचे हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार संतोष बांगर यांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी पंपाचं बिल थकीत होतं. महावितरणाकडून बिल थकवल्याने वीज कनेक्शन तोडण्यात येतेय. औंढा नागनाथमधील कुंडकर पिंपरीतील शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात आली. याबाबतची माहिती आमदार बांगर यांना मिळाली. त्यानंतर बांगर यांनी विद्युत विभागात फोन करुन कर्मचाऱ्याला दमदाटी केली. तसेच धमकीही दिली. बांगर यांचा फोनवर बोलतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय म्हणाले बांगर?

“कुंडकर पिंपरीची लाईन कुणी तोडली? तु औंढ्याचा असून तुला कळत नाही. दुसरं कुणी असतं तर मी रट्टे द्यायला लावले असत बरं. तुम्हाला सांगितलं होतं की लाईनीला हात नाही लावायचा म्हणून”, अशा शब्दात बांगर यांनी कर्मचाऱ्याला दमदाटी करत धमकी दिली. दरम्यान या वक्तव्यावरुन बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत.

मुख्यमंत्र्यांचाही धाक राहिला नाही?
दरम्यान बांगर यांनी ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. कार्यालयात तोडफोड केली होती. अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना झापलं होतं. या अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बांगर यांना दम भरला होता. मात्र यानंतरही बांगर राजरोसपणे शासकीय कर्मचाऱ्यांना दम देताना धजावत नाहीयेत. त्यामुळे बांगर यांना मुख्यमंत्र्यांचाही धाक राहिला नाही का, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.