उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला, फेसबुक लाईव्ह नव्हे तर थेट संवाद, आज मातोश्रीवर पत्रकारपरिषद
राजकारण

उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला, फेसबुक लाईव्ह नव्हे तर थेट संवाद, आज मातोश्रीवर पत्रकारपरिषद

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळे सरकार गेल्यानंतर आता ठाकरे घराण्यासमोर शिवसेनेच्या असित्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमवीर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र कंबर कसून कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भवनात बसून शिवसेनेतील विविध गटांच्या बैठक घेणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर पत्रकार परिषद बोलावली आहे. आज दुपारी दोन वाजता मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे कोणती नवी भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अलीकडेच वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे न्यायालयीन लढाईत किंवा निवडणूक आयोगाच्या कोर्टात आपला पराभव झाल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचा एकूण सूर पाहता त्यांनी एकनाथ शिंदे गटाशी सुरु असलेल्या लढाईत शस्त्रे खाली टाकून दिल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे याबाबत एखादा नवा खुलासा करणार का, हे पाहावे लागेल.

उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला

या पत्रकारपरिषदेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आपला पॅटर्न बदलल्याचे दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला होता. मात्र, आता शिवसेनेसाठी ‘करो या मरो’, अशी परिस्थिती उद्धवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला पॅटर्न बदलल्याचे दिसत आहे. फेसबुक लाईव्ह ऐवजी उद्धव ठाकरे आता थेट संवाद साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज ते मातोश्रीवर दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेत आहेत.