यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार
राजकारण

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार

बिहार : ”यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला.” असा धक्कादायक खुलासा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, अशा शब्दांमध्ये नितीश यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नितीश कुमार यांनी नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या मुख्यमंत्री पदाची सातव्यांदा शपथ घेतली. मात्र मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर जनता दल युनायडेट पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राजीव रंजन म्हणाले की, ‘नितीश यांना कोणत्याही पदाची हाव नाही. ते जनतेच्या इच्छेने पुन्हा मुख्यमंत्री झालेत. जनतेच्या इच्छेचा नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सन्मान करत हे पद स्वीकारलं आहे,’

रविवारी पाटण्यातील जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांनी अरुणाचलप्रदेशसह अनेक मुद्द्यांवर भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील त्यांच्या 7 आमदारांपैकी 6 आमदार त्यांच्या पक्षात विलीन केले.

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा नसल्याच्या त्यांनी पुनरुच्चार केला. नितीशकुमार यांनी पुन्हा म्हणाले की, निकालानंतर त्यांनी भाजपला स्पष्टपणे सांगितले होते की जनतेने निर्णय घेतला आहे, ज्याला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारावे, मग तो भाजपाचा मुख्यमंत्री असेल तरी चालेल. मात्र, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा माझ्यावर दबाव आला. जो कोणी मुख्यमंत्री होतो, कोणालाही मुख्यमंत्री करता येईल, मला काही हरकत नाही. ”

यंदाच्या त्यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राकेश राठोड यांनी नितीश कुमार नाटक करत असल्याचा टोला लगावला आहे. ”२०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर जीतन राम मांझी यांना नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री बनवलं होतं. मात्र नंतर नितीश कुमार स्वत: या पदावर विराजमान झाले, अशी आठवणही राठोड यांनी करुन दिली. भाजपाकडून होणाऱ्या अपमानामुळे मुख्यमंत्री दु:खी आहेत. यंदा जनतेने तेजस्वी यादव यांच्या बाजूने मतदान केलं होतं. नितीश जबरदस्तीने मुख्यमंत्री झालेत, असंही राठोड म्हणाले.