जर दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे?; मेहबूबा मुफ्तींचा केंद्राला सवाल
राजकारण

जर दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे?; मेहबूबा मुफ्तींचा केंद्राला सवाल

जम्मू काश्मीर : ”भाजपा मुस्लीमांना पाकिस्तानी संबोधतात. सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात, राष्ट्राच्या विरोधातील संबोधतात. मग असं असेल तर मला समजत नाही प्रत्येक जण दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे? केवळ भाजपाचे कार्यकर्ते?,” असं म्हणत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हलाबोल केला आहे. ”भाजपा काश्मीर खोऱ्यात स्वत:ची इको सिस्टम तयार करू पाहत आहे. ही कोणती लोकशाही आहे. ते आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परवानगी देत नाही. कलम ३७० हटवण्यावर चर्चा करू नका असं मला का सांगितलं जातय, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

इतकेच नव्हे तर, ज्या दिवशी आम्ही डीडीसीच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली, तेव्हापासून प्रशासनाकडून त्रास वाढला आहे. इतकंच काय तर आपल्या उमेदवारांनाही त्रास दिला जातोय. मला ताब्यात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आलेल्या वक्तव्यामुळे मी दु:खी आहे.’ असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, ”ते माझ्या पक्षावर निर्बंध घालण्याच्या प्रयत्न करत आहे. या ठिकाणी कोणतंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जर कोणी काही बोलण्याचा प्रयत्नही केला तर त्याच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत खटला दाखल केला जातो,” असा आरोपही त्यांनी केला. पीएजीडीच्या उमेदवारांवर निर्बंध घातले जात आहेत. त्यांना प्रचारासाठी बाहेर पडण्याचीही परवानगी दिली जात नाही. अशामध्ये आमचे उमेदवार निवडणुका कशा लढवणार, असा सवालही मुफ्ती यांनी यावेळी केला.