ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!
राजकारण

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी आणि सीबीआयनंतर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला आहे. याआधी ईडी देखील अनिल देशमुख यांची चौकशी करत असून त्यात आता आयकर विभागाची देखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथकं नागपूरमधली नसून बाहेरून आल्याची माहिती मिळत आहे.

आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुखांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचं हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयटीच्या पथकानं छापेमारी आहे. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.