‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ने वादंग; मोदी सरकारच्या निर्णायक हालचालींना वेग
राजकारण

‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ने वादंग; मोदी सरकारच्या निर्णायक हालचालींना वेग

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेची जोरदार तयारी सुरू असताना मंगळवारी देशाच्या नावावरून अचानक वादंग उद्भवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार व इतर प्रतिनिधींना धाडलेल्या जी-२० संदर्भातील अधिकृत निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे आहे. सत्ताधारी भाजप या इंडिया आघाडीला त्यांच्या नावावरून सातत्याने लक्ष्य करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० परिषदेसाठी धाडलेल्या निमंत्रण पत्रिकांवर शीर्षस्थानी ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख असल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले व राजकीय गदारोळ सुरू झाला. या बदलाचे भाजपने ठाम समर्थन केले आहे; तर, पंतप्रधान मोदी यांनी ‘इंडिया’चा (विरोधी आघाडी) किती धसका घेतला आहे, हेच यावरून कळून येते, असे विरोधकांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनी धाडलेल्या निमंत्रणपत्रिकेतील उल्लेख पाहता, ‘इंडिया’ हा शब्द देशाच्या नावासाठी वापरूच नये, या दृष्टीने केंद्राची पावले पडतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. तसे झाल्यास तमिळनाडूसह दक्षिणेकडील राज्ये, ईशान्य भारत व ओडिशासारख्या राज्यांतून त्यास विशेष विरोध होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजकीय पक्षांनी परजली शस्त्रे

देशाच्या नावासाठी इंडियाऐवजी भारत असा शब्दप्रयोग केल्याने सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आपापली शस्त्रे परजली आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी, विरोधकांना-त्यातही काँग्रेसला देशाचा सन्मान आणि गौरवाशी संबंधित प्रत्येक विषयावर इतका आक्षेप का आहे? ‘भारत जोडो’च्या नावाने राजकीय दौरे करणाऱ्यांना ‘भारत माता की जय’ या घोषणेचा तिरस्कार का वाटतो?, असा प्रश्न केला आहे.

पंतप्रधान मोदी इतिहासाचे कसे विकृतीकरण करत आहेत याचे हे आणखी उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. विरोधकांनी उद्या आपल्या आघाडीचे नाव इंडिया बदलून भारत केले तर मोदी भारताचेही नाव भाजप करतील काय, अशी बोचरी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, देशाचा इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की अचानक असे काय झाले की देशाचे नाव बदलण्याची गरज पडली, तर इंडिया आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे हे घडले आहे, असा दावा त्यांनी केला.

आम्ही सारे पक्ष एकत्र आलो तर फॅसिस्ट भाजपला देशाचेच नाव बदलावे वाटू लागले, असे टीकास्त्र तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सोडले. भाजपने भारताला बदलण्याचे आश्वासन दिले, पण ९ वर्षांनी आम्हाला फक्त नावात बदल मिळाला! भाजपला इंडिया या एकाच शब्दाची भीती वाटत आहे कारण हाच इंडिया भाजपला सत्तेतून हटवेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले की विरोधी पक्षांनी आघाडीचे फक्त नामकरण केले त्यानंतर केवळ काही आठवड्यांत भाजप नेतृत्व (मोदी) इतके अस्वस्थ होईल हे आम्हाला माहीत नव्हते.

राजद नेते तेजस्वी यादव यांनी उपरोधिकपणे म्हटले की आधी मोदी इंडियाला मत द्या म्हणायचे, मग आता ते का घाबरले? जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी, भाजप संसदेतील बहुमताच्या जोरावर संपूर्ण देशाला आपली मालमत्ता मानत आहे हेच त्यांची संकुचित वृत्ती आणि असहिष्णुता दाखवते अशी टीका केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी निमंत्रणपत्रात भारत असा उल्लेख केल्याचे स्वागत विश्व हिंदू परिषदेने केले आहे. आता आपण इंडिया विसरू या, असे विहिंपने म्हटले आहे.

काँग्रेसला भारतचे फारच वावडे असावे, असे दिसते, असा टोला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी लगावला आहे. आपल्या एक्स खात्यावर, रिपब्लिक ऑफ भारत असा उल्लेख सरमा यांनी केला आहे. आपण आता अतिशय धडाडीने अमृतकालाकडे वाटचाल करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.