भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी
राजकारण

भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”या भ्याड हल्ल्याला आम्ही कधीही विसरणार नाही. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या लोकांचं आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी दिलेल्या संदेशात मोदी म्हणाले की, “आजपासून 19 वर्षापूर्वी, 13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सर्व दहशतवाद्यांना मारलं होतं. या हल्ल्यात दिल्ली पोलीसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले होते.

संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या 5 आतंकवाद्यांनी 13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता अॅम्बेसेडर मधून संसद परिसरात प्रवेश केला. त्यांच्या येण्यापूर्वीच 40 मिनिटांअगोदर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 100 नेते त्यावेळी संसदेत उपस्थित होते.

या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु या अतिरेक्याला 15 डिसेंबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्यास फाशी देण्यात आली. अफजल गुरुला फाशी शिक्षा देण्यासाठी देशाला 12 वर्षे वाट पाहावी लागली. या शिक्षेची अंमलबजावणी 9 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करलण्यात आली.