धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी जयंत पाटलांचा भाजपला टोला

सांगली : भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला. वाळवा तालुक्यातल्या कुरळप इथे पी आर पाटील यांच्या अमृत महोत्सव सत्कार कार्यक्रमानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. जयंत पाटील म्हणाले की, “महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. त्यात पोलिसांनी काही निष्कर्ष काढला असेल आणि त्या महिलेमे तक्रार मागे घेतल्याचे आपण ऐकले.”

दरम्यान, जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जयंत पाटील म्हणाले की, “दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही.” असंही त्यांनी म्हंटल होतं.