काँग्रेसला मोठा झटका; माजी केंद्रिय मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी केंद्रिय मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी २०२२मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपनं गळाला लावल्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत.

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असं या गटाला म्हटलं गेलं. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचं पत्रच सोनिया गांधी यांना सादर केलं होतं. या गटामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.