शरद पवारांच्या दौऱ्यात भाजप नेत्याची हजेरी
राजकारण

शरद पवारांच्या दौऱ्यात भाजप नेत्याची हजेरी

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पक्षाचे दिवंगत नेते आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवसस्थानी भेट दिली. पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात मात्र भाजप नेत्याने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते कल्याण काळे यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज दिवंगत भारत (नाना) भालके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोलीत आलेल्या शरद पवार यांनी कल्याण काळे यांचे नाव घेत परिसराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही केले. लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले कल्याण काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

माढा, सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. पण त्यांची संधी हुकली. कल्याण काळे यांचा एक सहकारी आणि एक खासगी असे दोन साखर कारखाने आहेत. यावेळी शरद पवार यांनी कल्याण काळे यांच्यासोबतचाच एक फोटो ट्विट केला आहे.

सरकोली इथे स्व. भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन भारत नानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने पंढरपूरकरांवर मोठा आघात झाला आहे. गोरगरिबांना कायम रस्त्यावर उतरून मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आणि जनमानसात रमणारे त्यांचे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील. भारत नाना माझ्यावर नेहमीच अचल निष्ठा ठेवणारे असे जीवाभावाचे सहकारी होते. आयुष्यात काही राजकीय प्रसंग उद्भवले असतील तरी त्यांचे बारामतीशी नाते कधीही तुटले नाही. पंढरपूरकरांनीही त्यांना नेहमीच साथ दिली, तुमच्या प्रेमाची शक्ती त्यांना स्वर्गातही लाभो. असे ट्वीट पवार यांनी केले आहे.