काहीही करुन कसबा पोटनिवडणुकीत भाजपला विजय महत्त्वाचा का? ही चार कारणं वाचून क्रोनोलॉजी समजेल
राजकारण

काहीही करुन कसबा पोटनिवडणुकीत भाजपला विजय महत्त्वाचा का? ही चार कारणं वाचून क्रोनोलॉजी समजेल

गेल्या काही दिवसांपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच चुरशीची म्हणावी अशी विधानसभेची पोटनिवडणूक आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीसांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे. विशेष करून भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपला नागपूर आणि अमरावतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसबा आणि चिंचवड दोन्ही भाजपच्या ताब्यातील जागा आहेत. त्यामुळे भाजपला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. हा कौल एकप्रकारे राज्यातील कौलही मानला जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळेच भाजपने पूर्ण ताकद लावली होती. कसब्यातील निवडणूक उमेदवारी जाहीर होईपर्यंत एकतर्फी होईल असं चित्र होतं. कसबा भाजपचा बालेकिल्ला होता तसेच मुक्ता टिळकांच्या निधनामुळे सहानुभूती भाजपच्या बाजूने असेल असे वाटत होते. पण काँग्रेसचे उमेदवारीसाठी रवींद्र धंगेकरांचे नाव पुढे आल्यानंतर चित्र बदलले.

भाजपनंही सावध पवित्रा घेत तगडा जनसंपर्क असलेला कार्यकर्ता म्हणून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आणि टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. धंगेकरांच्या उमेदवारीमुळेच कसब्यातील चुरस वाढली.

रवींद्र धंगेकरांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना मानणारा मोठा मतदार कसब्यात असल्यानं काँग्रेस चुरस वाढली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. अजित पवारांच्या सततच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सक्रिय झाले. यामुळे भाजपलाही आपली संपूर्ण ताकद लावणे गरजेचे झाले. अगदी अमित शाहांना सुद्धा लक्ष घालावे लागले. देवेंद्र फडणवीस स्वत: जातीनं लक्ष घालून होते.

मुख्यमंत्रीही प्रचारात सक्रिय राहिले. यातून हेच दिसलं की भाजपसाठी कसबा जिंकणे अतिशय प्रतिष्ठेचे ठरले आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पराभूत झाला तर तो संदेश पक्षासाठी धक्कादायक असेल. दुसरीकडे रवींद्र धंगेकर ही निवडणूक जिंकले तर हा निकाल काँग्रेसला उभारी देणारा ठरू शकणार आहे. पक्षाची मरगळ झटकून टाकणारा ठरेल. त्यामुळे कसब्यात कोण बाजी मारणार हे केवळ पुण्याच्याच नाही तर राज्याच्या राजकारणासाठी कळीचं ठरणार आहे.